Home राजकीय पिंपरी-चिंचवड परिवर्तन विकास आघाडी महापालिका निवडणुकीच्या मैदानात भ्रष्टाचार मुक्त महानगरपालिका हाच मुख्य अजेंडा-छाया सोळंके जगदाळे

पिंपरी-चिंचवड परिवर्तन विकास आघाडी महापालिका निवडणुकीच्या मैदानात भ्रष्टाचार मुक्त महानगरपालिका हाच मुख्य अजेंडा-छाया सोळंके जगदाळे

महापालिकेतील ६०:४० भ्रष्ट भागीदारी मोडून काढण्याचा निर्धार.

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी (दि. १९ डिसेंबर २०२५) पिंपरी-चिंचवड परिवर्तन विकास आघाडी हा महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत राजकीय पक्ष असून, आगामी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत जास्तीत जास्त जागा लढवण्याचा निर्णय आघाडीने जाहीर केला आहे. सध्या महापालिकेत भ्रष्टाचाराने कळस गाठला असून, सत्ताधारी, विरोधी पक्ष आणि काही मुजोर वरिष्ठ महापालिका अधिकाऱ्यांची थेट ६०:४० अशी भागीदारी (पार्टनरशिप) सुरू असल्याचा गंभीर आरोप आघाडीने केला आहे. जोपर्यंत हे सर्व पक्ष आणि त्यांचे हस्तक महापालिकेतून हद्दपार होत नाहीत, तोपर्यंत भ्रष्टाचार थांबणार नाही, असा ठाम दावा आघाडीच्या संस्थापिका अध्यक्षा छाया सोळंके-जगदाळे यांनी केला आहे.

पिंपरी-चिंचवड परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने पिंपरीत शुक्रवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आघाडीच्या संस्थापिका अध्यक्षा छाया सोळंके-जगदाळे, उपाध्यक्ष सोमनाथ मंडलिक, सरचिटणीस निलेश जाधव, खजिनदार निर्मला रणखांब आदी उपस्थित होते.

राज्यातील सर्वात मोठ्या औद्योगिक शहरांपैकी एक असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये आजही सामान्य नागरिकांना पाणी, ड्रेनेज, रस्ते, वाहतूक, सार्वजनिक वाहतूक, आरोग्य सेवा यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. विकासाचे फलक, पुरस्कार आणि जाहिरातबाजी मोठ्या प्रमाणावर होत असली तरी प्रत्यक्षात नागरिकांच्या जीवनात विकास पोहोचलेला नाही, अशी टीका करण्यात आली. शहरातील रुग्णालयांकडून होणारी आर्थिक लूट, बेरोजगारी, स्थानिक हक्कांचे उल्लंघन, झोपडपट्टी पुनर्वसनातील अन्याय, कचरा व पर्यावरण प्रदूषण, महिलांची सुरक्षितता, वाढती गुन्हेगारी व अमली पदार्थांचा प्रभाव याकडे लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही करण्यात आला.

शहरातील मूळ भूमिपुत्र व स्थानिक रहिवाशांच्या शेती, घरे आणि जमिनींवर बिल्डरधार्जिणे डीपी व टीपी लादण्यात आल्याने मोठा अन्याय होत असून, हे निर्णय तात्काळ रद्द झाले पाहिजेत, अशी मागणी आघाडीने केली. बहुसंख्य लोकप्रतिनिधी हे बांधकाम व्यावसायिक व एस.आर.ए. प्रकल्पांशी संबंधित असल्याने हे अन्यायकारक निर्णय कायम राहिले, असा आरोपही करण्यात आला.

banner

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बचत गटांच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती, शहरातील कोलमडलेली आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी चिखली परिसरात सुसज्ज व अत्याधुनिक रुग्णालय उभारणे, रेड झोनमधील नागरिकांच्या प्रश्नांवर समान धोरण राबवणे, विलंब दंड व रेडझोनमुक्तीचे प्रश्न सोडवणे ही आघाडीची प्राधान्ये असतील, असे स्पष्ट करण्यात आले.

ज्या उमेदवारांना शहराबद्दल खरी आपुलकी आहे आणि जे निर्भीड, स्वच्छ व पारदर्शक कारभार करू शकतात, अशा सर्व उमेदवारांनी—ते कोणत्याही पक्षातील असोत—पिंपरी-चिंचवड परिवर्तन विकास आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढवावी, असे आवाहन करण्यात आले. आघाडीतील उमेदवारांवर कोणत्याही बाह्य दबावाशिवाय निर्णय घेण्याची मुभा असेल आणि पिंपरी-चिंचवडचा कारभार मुंबई, दिल्ली, बारामती किंवा नागपूरच्या आदेशांवर नव्हे, तर पिंपरी-चिंचवडकरांच्या हितासाठी, इथूनच चालवला जाईल, असा संकल्प आघाडीने व्यक्त केला. “आपले शहर, आपले सरकार” हा नारा देत, भ्रष्ट पक्ष व नेतेमंडळींना महापालिकेतून हद्दपार करण्यासाठी प्रामाणिक उमेदवारांनी परिवर्तन विकास आघाडीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?