पिंपरी चिंचवड प्रतिनिधी दि.१८ डिसेंबर २०२५
विद्यानंद भवन हायस्कूलचे बहुप्रतिक्षित वार्षिक स्नेहसंमेलन दि.१८ डिसेंबर २०२५ रोजी ग.दि.माडगूळकर सभागृहात अत्यंत उत्साहात आणि सांस्कृतिक वातावरणात पार पडले. ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या आकर्षक संकल्पनेतून महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेचे सुंदर दर्शन या कार्यक्रमात घडविण्यात आले.
या कार्यक्रमास शाळेच्या मॅनेजर डॉ.श्वेता पाटील,ट्रस्टी डॉ.जे. शजी.पाटील, सचिव प्रा.डी.आर.कर्णुरे तसेच शाळेचे प्राचार्य श्री. सिरील अँथनी जगन यांची मान्यवर उपस्थिती लाभली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे शाळेची शैक्षणिक व सांस्कृतिक वाटचाल अधिक भक्कम होत आहे.
या प्रसंगी शाळेने सलग ३३ व्या वर्षी एस.एस.सी. परीक्षेत १००% निकाल लावल्याची उल्लेखनीय कामगिरी अधोरेखित करण्यात आली. कु. पूर्वा राकेश पागरे हिने ९७.६०% गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. तिने ६ पैकी ५ विषयांत सर्वोच्च गुण मिळवून शाळेच्या यशात भर घातली.
सांस्कृतिक कार्यक्रमांतून कोळी गीत, भारुड, गवळण तसेच महाराष्ट्रातील संतांचे जीवन व विचार यांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. प्रत्येक नृत्य व अभिनयात शिस्त, सौंदर्य आणि लोकसंस्कृतीची खरी ओळख दिसून आली व प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळाली.
कार्यक्रमाचा कळसाध्याय ठरलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा अत्यंत भव्य आणि प्रभावी पद्धतीने सादर करण्यात आला. ऐतिहासिक भव्यता, उत्कृष्ट नेपथ्य आणि सशक्त सादरीकरणामुळे हा प्रसंग प्रेक्षकांच्या मनात कायमचा ठसा उमटवून गेला व संपूर्ण कार्यक्रमातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला.
हे वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे संस्कृती, कला आणि शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव ठरला असून, विद्यानंद भवन हायस्कूलच्या सर्वांगीण विकासाच्या ध्येयाची प्रचीती देणारे ठरले.
