Home राजकीय समाजात विचारांचा एकोपा जपणे ही काळाची गरज*. डॉ. संजय उपाध्ये यांचे प्रतिपादन

समाजात विचारांचा एकोपा जपणे ही काळाची गरज*. डॉ. संजय उपाध्ये यांचे प्रतिपादन

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी चिंचवड (दिनांक २१ फेब्रुवारी २०२६) व्यक्ती, कुटुंब, समाज आणि राष्ट्र हे जीवनातील चार महत्त्वाचे घटक असून या सर्वांच्या उभारणीची सुरुवात स्वतःशी संवाद साधण्यापासून होते. कुटुंबात संवाद, समाजात समन्वय आणि राष्ट्रासाठी बांधिलकी निर्माण झाली तरच खऱ्या अर्थाने एकोप्याचा समाज उभा राहू शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. संजय उपाध्ये यांनी केले.
चिंचवड येथील काशीधाम मंगल कार्यालय येथे गांधी पेठ तालीम मित्र मंडळ आयोजित ७५ वे अमृत महोत्सवी मासिक प्रवचन संपन्न झाले. यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.”विचार करूनच बोला” या विषयावर त्यांनी आपले विचार मांडले.
कार्यक्रमाला मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार शंकर जगताप, महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर , नगरसेवक शेखर चिंचवडे, मनीषा चिंचवडे,राहुल कलाटे, मोरेश्वर शेडगे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच ज्ञानदीप विद्यालयाचे माजी प्राचार्य सुबोध जी गलांडे,लेखक व साहित्यिक राजेंद्र घावटे यांनीही उपस्थिती दर्शवली.
डॉ. उपाध्ये पुढे म्हणाले की, व्यक्तीचा स्वतःच्या मनाशी संवाद होणे अत्यंत आवश्यक आहे. विचारपूर्वक कृती केल्यास जीवनात शांतता आणि समतोल साधता येतो. दुसऱ्याशी संवाद साधताना शब्दांची निवड आणि पद्धत सकारात्मक असावी. कुटुंब एकत्र राहिले तरच समाज सुदृढ बनतो आणि समाज राष्ट्राची उभारणी करतो. त्यामुळे एकत्र येणे, ऐकणे आणि समजून घेणे ही पहिली पायरी आहे. बदल हा श्रवणातून आणि आत्मपरीक्षणातूनच घडतो.
संत परंपरेचा उल्लेख करताना त्यांनी संत ज्ञानेश्वर यांच्या ‘वसुधैव कुटुंबकम्’ या विचाराची आठवण करून दिली. समाजातील प्रत्येक व्यक्तीने राष्ट्रीय हिताचा विचार करून कार्य करावे. जातीभेद आणि मतभेद विसरून एकत्र येणे ही आजची गरज आहे. “कृती सूक्ष्म आणि विचार व्यापक असावेत. विभक्ती नको, भक्ती आणि एकोप्याची प्रत्ययकारी कृती हवी,”असे ते म्हणाले.
समाजाची वैचारिक उंची वाढवण्यासाठी प्रत्येकाने सामाजिक जबाबदारी स्वीकारावी, एकमेकांना मदत करावी आणि माणसे जोडण्याचा संकल्प करावा. “एक एक वीट रचूनच भक्कम इमारत उभी राहते. त्याचप्रमाणे माणसे जोडल्याशिवाय सशक्त समाज निर्माण होणार नाही. वारकरी संप्रदायाचा आदर्श ठेवून एकोप्याने जगण्याची संख्या समाजासमोर दाखवावी,” असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजाभाऊ गोलांडे यांनी केले तर सूत्रसंचालन सुहास पोफळे यांनी केले.
या प्रवचनातून समाजात विचारांचा एकोपा,संवादाची गरज आणि एकत्रित कृतीचे महत्त्व अधोरेखित झाले.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?