प्रतिनिधी आळंदी (दिनांक २७ मार्च २०२६) सावित्रीबाई फुले पुणे, विद्यापीठ पुणे व श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय, डुडुळगाव, आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने “ निर्भय कन्या अभियान “ अंतर्गत सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग आणि अँटी रॅगिंग या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी पाहुण्यांचा परिचय प्रा. दिपाली ताम्हाणे यांनी करून दिला.विद्यार्थी विकास मंडळाचे प्रमुख प्रा. माणिक कसाब यांनी प्रस्ताविक प्रसंगी संबंधित कार्यक्रम विद्यार्थिनींच्या स्वयसंरक्षणासाठी अत्यंत महत्वपूर्ण असून त्यासाठी ‘सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग आणि अँटी रॅगिंग’ ही कार्यशाळा आयोजित करणे कसे महत्त्वाचे आहे या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली.
ॲड. पदमावती पाटील सहसचिव- पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशन, यांनी अँटी रॅगिंग या विषयाला न्याय देतांना अँटी रॅगिंग ही संकल्पना काय आहे? त्याचे परिणाम काय होतात? त्यासाठी भारतीय संविधानामध्ये कोणत्या कलमांची तरतूद केलेली असून त्या बरोबरच संबंधित कायद्याला अनुसरून विद्यार्थिनीच्या बाबतीत कशी भूमिका घेणे आवश्यक आहे. या संदर्भात सविस्तर विवेचन करून महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भात भारतीय राज्यघटनेत नियोजन केलेले असून महिलांना त्या कायद्यांचा कसा फायदा होतो या संदर्भात मत मांडून स्वसंरक्षण काळाची गरज आहे याबाबत विविध उदाहरणाचे दाखले देत सखोल मार्गदर्शन करण्यात आले
सेल्फ डिफेन्स या विषयावर मत मांडतांना कु.पायल पाटील- तायकांडो कराटे प्रशिक्षक, यांनी पी.पी.टी.च्या माध्यमातून सेल्फ डिफेन्स म्हणजे काय? त्याचा उदय कधी झाला तसेच स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षणाची गरज आहे. त्याचबरोबर कराटेचे विविध प्रकार कोणते आहेत? लाठी काठी, नान चॉकू हे प्रकार स्वसंरक्षणासाठी कसे महत्वपूर्ण आहेत या संदर्भात ऐतिहासिक दाखले देत प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
महात्मा फुले महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापिका डॉ. शितल जाधव यांनी “स्वजाणीव’ व आरोग्य ‘ या विषयावर भाष्य करतांना आधुनिक काळात प्रत्येक स्त्रीने स्वतःला ओळखण्याची आवश्यकता प्रतिपादन करून स्त्री ही वेळेनुसार कशाप्रकारे आई,बहीण,बायको, वाघीण तसेच नागिन बनते या संदर्भात ऐतिहासिक दाखले देऊन अनमोल मार्गदर्शन केले. तसेच आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी स्त्रीने आपल्या आरोग्याची काळजी कशा प्रकारे घेतली पाहिजे हे वेगवेगळ्या पद्धतीने सांगितले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग मिसाळ यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना स्त्री पुरुष समानता आधुनिक काळात कशी महत्त्वाची असून पुरुष मानसिकता बदलण्याची आवश्यकता प्रतिपादित केली. सद्य परिस्थितीत विद्यार्थिनींनी स्वसंरक्षणासाठी कसे तत्पर असले पाहिजे तसेच यासाठी स्वसंरक्षणाच्या विविध प्रकाराचे अवलोकन करून स्वसंरक्षणाचे प्रकार स्वीकारण्याची आवश्यकता विशद केली. या प्रसंगी उपस्थित सर्व विद्यार्थिनींना प्रमाणपत्राचे वाटप मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खनिजदान मयूर मुरलीधर ढमाले यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. व या कार्यक्रमासाठी प्रवीण भावे,कार्यालयीन अधीक्षक,प्रा.प्रफुल्ल जाधव,बी.बी.ए.सी.ए.विभाग प्रमुख प्रा. रोहित कांबळे, परीक्षा विभाग प्रमुख,प्रा.डॉ. देवानंद गोरडवार, सांस्कृतिक विभाग प्रमुख, प्रा.प्रभाकर गायकवाड, प्रा.डॉ. रंजीत कदम, प्रा. रेखा सुतार,प्रा. दिपाली सोनवणे, प्रा. रूपाली औटे,प्रा.पूजा खेडकर,प्रा. प्राजक्ता पवार,ग्रंथालय विभाग प्रमुख,सौ.वर्षा ताजने, सचिन गावडे, वैभव बडवे,श्रीकांत कांबळे इत्यादी विभाग प्रमुख, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि कला,वाणिज्य व बी.बी.ए.(सी.ए)बी.सी.ए शाखेतील विद्यार्थिनीची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दीपक देवकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा.सविता मानके , भूगोल विभाग प्रमुख यांनी मानले. सदर कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने झाली.
