चाकण प्रतिनिधी (दिनांक ५ जून २०२६) अल्पवयीन मुलांच्या कलागुणांना वाव देणे व त्यांना व्यासपीठ तयार करून प्रोत्साहन देण्यासाठी चाकण पठारवाडी येथे नव्याने सुरू झालेल्या निर्माण बहुउद्देशीय विकास संस्था व CRY यांच्या संयुक्त विद्यमाने चाईल्ड रिसोर्सस अॅक्टिव्हिटी सेंटर पठारवाडी येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये प्रामुख्याने पर्यावरण जनजागृती रॅली, स्वागतगीत, भाषण, नाटक, चित्रकला, घोषवाक्य, लेखन, झाडे लावा – झाडे जगवा, अभियान पर्यावरण संरक्षणाची शपथ, मुलांची रॅली असे विविध उपक्रम बालकांच्या माध्यमातून सादर करण्यात आले
यावेळी सर्व बाल चिमुंनी पर्यावरण जनजागृतीपर घोषणांनी परिसर दुमदुमून काढला. शुभांगी गावडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर शौर्य पठारे याने कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व पालक व उपस्थितांचे स्वागत केले. आरोही पठारे, तनिष्का पठारे, जय आल्हाट, साई शिंदे, अन्वी पठारे, अदिती पठारे या मुलांनी पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व सांगणारी भाषणे सादर केली. व चित्रकला, घोषवाक्य, लेखन आणि वृक्षसंवर्धनाला अनुसरून विद्यार्थ्यांनी नाटक सादर केले.
झाडे लावा – झाडे जगवा, पाणी वाचवा – जीवन वाचवा यांसारखे संदेश देत मुलांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली. कार्यक्रमातून निसर्गाचे महत्त्व, पाण्याची बचत आणि स्वच्छ पर्यावरण राखण्याची गरज याबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी परिसरातील बाल मित्रांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली तसेच कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शुभांगी गावडे, वैशाली पठारे, तृप्ती जाधव यांनी विशेष परिश्रम घेतेले. या प्रसंगी संस्थेचे कर्मचारी, स्वयंसेवक, पालक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
