पिंपरी, २ डिसेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरिकांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि जनजागृतीसाठी विविध नाविन्यपूर्ण आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून उपक्रम सातत्याने राबवत असते. पिंपरी चिंचवड शहर पूर्णपणे रेबीजमुक्त करण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षित पथके आणि मजबूत व्यवस्थापन प्रणाली यांच्या आधारे ‘पीसीएमसी रेबीज नियंत्रण कार्यक्रम’ महापालिकेने सुरू केला आहे. या मोहिमेंतर्गत नागरिकांच्या सहभागासोबत तांत्रिक व शास्त्रीय पद्धतींचा एकत्रितपणे उपयोग करून सर्वंकष रेबीज नियंत्रण साध्य करण्यावर महापालिका विशेष भर देत आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महापालिका आणि मिशन रेबीज यांच्या संयुक्त विद्यमाने आज ‘पीसीएमसी रेबीज नियंत्रण कार्यक्रम’ या मोहिमेचा औपचारिक शुभारंभ निगडी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे अतिरिक्त आयुक्त खोराटे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. पीसीएमसी रेबीज नियंत्रण कार्यक्रम वर्षभर राबविण्यात येणार असून या अनुषंगाने विशेष हेल्पलाईनचे उद्घाटन तसेच लसीकरण पथके आणि रेबीज रिस्पॉन्स टीमसाठी नियुक्त करण्यात आलेल्या वाहनांचेही लोकार्पण करण्यात आले.
महापालिका उपायुक्त संदीप खोत, सहाय्यक आयुक्त श्यामकांत पाटील, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोरी नलावडे, एमएसडी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. यश गोयल, मिशन रेबीजचे संचालक डॉ. मुरगून अप्पूपिल्लई, लॉजिस्टिक संचालक प्रविण ओवळ, महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी यांच्यासह नागरिक यावेळी उपस्थित होते.
अतिरिक्त आयुक्त खोराटे म्हणाले, रेबीजमुक्त शहराच्या दिशेने टाकलेले हे एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल आहे. वैज्ञानिक पद्धतींचा वापर, प्रशिक्षित पथकांची तैनाती आणि मजबूत देखरेख व्यवस्था यांच्या मदतीने हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षा लक्षात घेऊन लसीकरण, तात्काळ प्रतिसाद आणि जनजागृती हे तीनही घटक महापालिका प्राधान्याने अंमलात आणत आहोत. मिशन रेबीज आणि एमएसडी ॲनिमल हेल्थ यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम आणखी सक्षम आणि परिणामकारक ठरेल, असेही अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी सांगितले.
दरम्यान, मिशन रेबीज प्रकल्पाने सिद्ध केलेल्या जागतिक ख्यातीच्या मॉडेलवर आधारित हा उपक्रम महापालिकेच्या माध्यमातून एक डेटा-आधारित, शाश्वत आणि मोठ्या प्रमाणावर राबविता येणारा रेबीज नियंत्रण कार्यक्रम असणार आहे. यामुळे भविष्यात पूर्णपणे रेबीजमुक्त समुदाय निर्माण करण्याचा मार्ग मोकळा होणार असून या प्रकल्पांतर्गत प्रशिक्षित पथके संपूर्ण शहरात कुत्र्यांचे लसीकरण करतील. यासाठी वर्ल्ड व्हेटरिनरी सर्व्हिस (डब्लूवीएस) अॅप आणि जीआयएस आधारित मॅपिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे, अशी माहितीही यावेळी पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने देण्यात आली.
रेबीज नियंत्रण अधिक प्रभावी करण्यासाठी महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत विशेष रेबीज हेल्पलाईन (+918788070665) सुरू करण्यात आली आहे. नागरिकांना रेबीजची शंका असलेले किंवा संशयास्पद प्राणी येथे कळवता येतील. या हेल्पलाईनसाठी एक विशेष रेबीज रिस्पॉन्स टीम (आरआरटी) सज्ज ठेवण्यात आली आहे, जी तत्काळ तपासणी करून आवश्यक ती कारवाई करणार आहे. मिशन रेबीज हे नॉलेज पार्टनर म्हणून महापालिकेच्या देखरेख पथकासोबत काम करणार आहे.
मिशन रेबीजसारख्या जागतिक ख्यातीच्या संस्थेसोबतच्या भागीदारीमुळे लसीकरण, देखरेख आणि जनजागृती या तिन्ही घटकांना भक्कम आधार मिळत आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी रेबीज प्रतिसाद पथक, हेल्पलाईन आणि तंत्रज्ञान आधारित लसीकरण उपक्रम राबविले जात आहेत. सर्व विभागांच्या समन्वयाने हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येईल आणि आम्ही भविष्यात रेबीजमुक्त समुदाय निर्माण करण्यास महापालिका सातत्याने प्रयत्नशील आहे.
