पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी):– २६ नोव्हेंबर १९४९ हा दिवस केंद्र सरकारने २०१५ पासून संविधान दिन म्हणून साजरा करण्यात सुरुवात केली असून त्याला अनुसरून पिंपरी चिंचवड शहरातील पत्रकारांनी महानगरपालिकेतील तिसऱ्या मजल्यावरील पत्रकार कक्षामध्ये संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून “संविधान दिन” साजरा केला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब गोरे व ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब ढसाळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमास पत्रकार सुनिल उर्फ बाबू कांबळे, प्रविण शिर्के, सुरज साळवे, विनायक गायकवाड, गणेश शिंदे, देवा भालके,दिनेश दुधाळे,दिलीप देहाडे,संतोष जराड, विकास साळवे, संतलाल यादव, अशोक कोकणे,अर्चना मेंगडे, सीता जगताप,मंदा बनसोड,शहनाज कुरणे, विश्वजित पाटील, अमोल सपकाळ, नारायण भालेराव, भीमराव बरकडे आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जेष्ठ पत्रकार बापूसाहेब गोरे म्हणाले की,” संविधान दिनाचे आयोजन पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या पुढाकारने झाल्यामुळे अतिशय आनंद वाटतो. संविधानाची ओळख करून घेण्याची खरी गरज प्रसारमाध्यमामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाची जास्त आहे. पत्रकार हे दररोज समाज विघातक कृत्य करणाऱ्या शक्तींशी लढत असतात अशावेळी त्यांना खरे संरक्षण संविधानाचे असतें. देशातील अनेक जाती ,धर्म, पंथ व भाषा यांना एका धाग्यात बांधून ठेवण्याचं काम संविधान करते. लोकशाहीचा खरा आत्मा संविधान असल्यामुळे प्रत्येक नागरिकांनी संविधानाची ओळख करून घेणे गरजेचे आहे.
” भारतीय संविधान असा एक ग्रंथ आहे त्यावर मानवी जीवन अवलंबून आहे. नागरिकांची जात व धर्म कोणताही असो त्याचा खरा धर्म भारतीयत्व असला पाहिजे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मसुदा समितीत काम करत असताना दोन वर्ष ११ महिने १८ दिवस अथक परिश्रम करून संविधानाची निर्मिती केली. संविधानाचे ७५ वे अमृत महोत्सवी वर्ष असून नागरिकांनी राज्यकर्ते संविधानाची तोडमोड करत असल्याचे लक्षात घेतले पाहिजे. संविधान प्रत्येक भारतीयांची जगण्याची पद्धती आहे आणि भारतीय नागरिक संविधान वाचवतील अशी खात्री असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब ढसाळ यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सुरज साळवे यांनी तर आभार पत्रकार मुकेश जाधव यांनी मानले
