आळंदी प्रतिनिधी चाकण शहर तसेच लगतच्या गावांमधील कचरा सध्या खराबवाडी गावच्या गायरान जागेत टाकला जात आहे. या ठिकाणी कचरा टाकण्यास स्थानिक रहिवाशांचा तीव्र विरोध असून या ठिकाणी साचलेला कचरा अज्ञात व्यक्तींकडून रात्री अपरात्री जाळण्यात येत असल्याने घातक वायूच्या धुराचे लोट निर्माण होऊन परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. चाकण परिसरातील वाढत्या लोकसंख्ये मुळे व औद्योगिकी करणामुळे कचरा व्यवस्थापनाची समस्या दिवसें दिवस गंभीर होत चालली आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितिन गोरे यांनी याबाबत गांभीर्याने लक्ष देऊन, पावसाळी अधिवेशन दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उद्योगमंत्री उदयजी सामंत यांच्याकडे चाकण शहर व परिसरातील कचरा शास्त्रोक्त पद्धतीने विघटन करण्यासाठी स्वतंत्र जागा चाकण औद्योगिक क्षेत्रामध्ये उपलब्ध करून देण्याबाबत ठोस मागणी केली होती.
यावेळी मंत्री महोदयांनी याबाबत त्वरित दखल घेऊन सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच योग्य जागा उपलब्ध करून देण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी पुणे यांना दिले होते. तसेच त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी, पुणे यांच्याकडे या संदर्भात खेड-आळंदी विधानसभेचे आमदार बाबाजीशेठ काळे यांच्या समवेत निवेदन देण्यात आले असून जिल्हाधिकारी साहेबांनी त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
या निर्णयामुळे चाकण शहर व लगतच्या गावांमधील कचरा विघटन जागेची समस्या लवकरच सुटणार असून, नागरिकांना आरोग्यदायी व प्रदूषण मुक्त निरोगी वातावरण मिळण्यास मदत होणार आहे.
