पिंपळे नीलख (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार, पिंपरी चिंचवड शहर व तुषार गजानन कामठे सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने महिलांसाठी विशेष हळदी-कुंकू समारंभ व खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पिंपळे निलख येथील महिला भगिणींचा उत्स्फुर्त असा प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निवेदक संदीप पाटील यांनी करत उपस्थित संपुर्ण महिला वर्गाला पैठणीच्या खेळामध्ये सहभागी करून घेतलं. तसंच कार्यक्रमामध्ये रंगत भरली.
दरम्यान, आयोजक माजी नगरसेवक तुषार कामठे यांनी उपस्थित महिला भगिणींना संबोधित करत, ‘जेव्हा केव्हा माझ्या महिला भगिनींवर संकट ओढवेल, जेव्हा केव्हा माझ्या महिला भगिनींवर अन्याय होईल, तेव्हा तुमचा भाऊ म्हणून, तुमचा मुलगा म्हणून हा तुषार गजानन कामठे मायेची शाल आणि छातीची ढाल बनून तुमच्यापाठीशी खंबीरपणे उभा असेल, अशी ग्वाही दिली.
तसंच या कार्यक्रमा अंतर्गत महिलांच्या सक्षमीकरणासाठी ई-पिंक रिक्षा नोंदणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत शेकडो महिला भगिनींनी या शिबिराचा लाभ घेतला. महिलांनी स्वत:च्या पायावर उभं राहून कर्तृत्वाची एक एक शिखरं स्वबळावर पार करावीत असं आवाहन यावेळी श्री.कामठे यांनी केलं.
