Home शिरूरमहाराष्ट्र किशोर आवारे खून खटल्यात साक्षीदारांवरील दबावाचे आरोप

किशोर आवारे खून खटल्यात साक्षीदारांवरील दबावाचे आरोप

साक्ष बदलण्यासाठी’ धमकावल्याचा दावा; पोलिस संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी प्रतिनिधी (दिनांक १२ सप्टेंबर २०२६) तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्या खून खटल्यात साक्षीदारांवर दबाव आणला जात असल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यासंदर्भात पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत साक्षीदारांनी विविध दावे केले. गोळीबाराची धमकी, मध्यरात्री घर गाठून धमकावणे, साक्ष बदलण्यासाठी दबाव आणणे तसेच पोलिस संरक्षण काढून घेतल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

 

किशोर आवारे यांची १२ मे २०२३ रोजी तळेगाव नगरपरिषदेसमोर गोळ्या झाडून हत्या झाली होती. या प्रकरणाचा सत्र खटला क्रमांक ५४/२०२३ वडगाव मावळ येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात सुरू आहे. तपासादरम्यान गोळा करण्यात आलेले इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब खटल्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. यावेळी सर्व साक्षीदारांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली.

 

banner

प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आकाश जगताप यांनी घटनेच्या वेळी मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याचा दावा करण्यात आला आहे. उलटतपासणीदरम्यान आपल्यावर साक्ष देऊ नये म्हणून दबाव आणण्यात आला तसेच बंदुकीचा धाक दाखविण्यात आल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितल्याचा उल्लेख प्रसिद्धीपत्रकात आहे.

दत्तात्रय पारगे यांनीही साक्ष बदलण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप केल्याचे सांगण्यात आले. जानेवारी २०२६ मध्ये काही व्यक्तींनी आपल्याला एका ठिकाणी नेऊन खोटी साक्ष देण्यासाठी दबाव आणला, तसेच ३० मार्च रोजी मध्यरात्री घरी गाठून धमकी दिल्याचा दावा त्यांनी केल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे. त्यानंतर काही साक्षीदारांना चोवीस तास पोलिस संरक्षण देण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

 

मिलिंद अच्युत यांनीही आपल्याला धमकी मिळाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर त्यांना पोलिस संरक्षण देण्यात आल्याचे सांगण्यात आले. अनिल पवार यांच्या पोलिस संरक्षणाबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यांच्यावर यापूर्वी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई झाली होती. विशेष सत्र न्यायालयाने जामीन मंजूर करताना या कारवाईबाबत निरीक्षण नोंदविल्याचा दावा पत्रकार परिषदेत करण्यात आला.

 

दरम्यान, मोहसीन मुलाणी यांनी किशोर आवारे यांच्या हत्येपूर्वी कटाची माहिती मिळाल्याचा तसेच त्याबाबत आवारे यांना सावध केल्याचा दावा केला आहे. त्यानंतर आपला जबाब बदलण्यासाठी दबाव आणण्यात आल्याचेही त्यांनी सांगितल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे. या प्रकरणातील काही आरोप आणि दावे न्यायालयीन प्रक्रियेत तपासले जाणे बाकी आहेत. त्यामुळे संबंधित आरोपांबाबत न्यायालयीन निष्कर्ष होणे अद्याप बाकी आहे.

 

पिंपरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेस आकाश जगताप, मोहसीन मुलाणी, अनिल पवार, मिलिंद अच्युत, दत्ता पारगे, निलेश पारगे, सुनिल करंडे आदी उपस्थित होते. साक्षीदारांना धमक्या देणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, महत्त्वाच्या साक्षीदारांना सातत्याने पोलिस संरक्षण द्यावे आणि त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

या प्रकरणाची उच्च न्यायालयातील पुढील सुनावणी २४ सप्टेंबर २०२६ रोजी, तर वडगाव मावळ येथील सत्र न्यायालयातील पुढील सुनावणी १ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.

 

फोटोओळ – पत्रकार परिषदेच्या वेळी डावीकडून आकाश जगताप, मोहसीन मुलाणी, अनिल पवार, मिलिंद अच्युत, दत्ता पारगे, निलेश पारगे, सुनिल करंडे आदी

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles