पिंपरी चिंचवड प्रतिनिधी (दिनांक २६ ऑक्टोंबर २०२६) तीर्थक्षेत्र देहूगाव येथील गाथावनात ‘आपला परिवार सोशल फाउंडेशन चिंचवड पुणे’च्या वतीने .‘मस्तीत पण शिस्तीत’ या ब्रीदवाक्याचा प्रत्यय देत.‘एक कुटुंब–एक झाड’ या संकल्पनेतून १०८ कुटुंबांच्या शुभहस्ते १०८ देशी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.
पर्यावरण संवर्धन, कुटुंबभावना आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम ठरलेल्या या उपक्रमात सुमारे ४०० सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
सकाळी सात वाजता वृक्षदिंडीने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.गाथावनात दाखल झाल्यानंतर मंत्रोच्चारात वृक्षपूजन करण्यात आले.यावेळी उपस्थितांनी गुलाबपुष्पांच्या पाकळ्यांचा वर्षाव करीत पर्यावरण संवर्धनाचा आनंदोत्सव साजरा केला.त्यानंतर १०८ कुटुंबांनी देशी वृक्षांची लागवड करून आपल्या रोपाच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली.
‘झाड लावायचेच नाही,तर ते जगवायचे,’असा संकल्प यावेळी करण्यात आला.
संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज,‘वृक्षदायी’ संस्थेचे अध्यक्ष व ‘हरित वारी’चे प्रणेते ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे आणि अभंग इंग्लिश मीडियम स्कूलचे संचालक प्रा.विकास कंद यांनी मार्गदर्शन केले.मोरे यांनी वृक्षसंवर्धन ही पुढील पिढीप्रती सामाजिक जबाबदारी असल्याचे सांगत,‘गावोगावी संत गाथा वृक्षरूपाने मांडणार,’ असा संकल्प व्यक्त केला.
कुटुंब ही समाजाची पहिली शाळा असून पर्यावरण संवर्धनाची संस्कृती कुटुंबातूनच रुजते,असे प्रा.कंद यांनी नमूद केले.
‘ऑक्सिजन फॅक्टरी’चे गाथावनात रूपांतर!
जुलै २०२१ मध्ये याच परिसरात सुरू झालेल्या ‘ऑक्सिजन फॅक्टरी’ संकल्पनेने पुढे ‘गाथावन’चे रूप घेतले. वृक्षारोपणासोबत वृक्षसंवर्धन,स्वच्छता अभियान आणि पर्यावरण जनजागृतीचे कार्य सातत्याने सुरू आहे. वर्षभर सामाजिक उपक्रमांची परंपरा जपत फाउंडेशनकडून आयोजन केले जाते.
कार्यक्रमाचे तसेच आपला परिवार संस्थेचे अध्यक्ष एस.आर.शिंदे यांनी, “१०८ वृक्ष ही केवळ रोपे नाहीत; ती १०८ कुटुंबांची पर्यावरणाशी जोडलेली नाती आहेत,” असे सांगितले.
प्रास्ताविक अजित भालेराव यांनी केले,तर सूत्रसंचालन राधा मराठे यांनी केले.पर्यावरणीय कार्यात योगदान देणाऱ्या सदस्यांचा गौरव करण्यात आला.
सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. आगामी काळात कुटुंबीयांनी घरून डबा आणून गाथावनात वनभोजनाचा आनंद घ्यावा,असे आवाहन शिंदे यांनी केले.यामुळे गाथावन हे वृक्षसंवर्धनासोबतच स्नेहबंध आणि निसर्गस्नेहाचे केंद्र बनविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय शिर्के,दीपक मराठे,अनिल शर्मा,वामन आवटे,यशवंत महाजन,अजित भालेराव दत्ता देवकर,किरण कांबळे दत्ता बोऱ्हाडे,राजेश हजारे, आणि संदीप दरवेशी यांनी विशेष प्रयत्न केले.
देहूगाव येथील गाथावनात १०८ कुटुंबांच्या हस्ते देशी वृक्षांचे रोपण करताना ‘हरित वारी’चे प्रणेते ह भ प शिवाजी महाराज मोरे व ‘आपला परिवार’चे सदस्य.
