आळंदी प्रतिनिधी : आळंदी (दिनांक १० जून २०२६) नगरपरिषदेच्या कचरा डेपोमध्ये घनकचरा व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. कचऱ्याची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावण्याऐवजी तो वारंवार जाळला जात असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर, दुर्गंधी आणि प्रदूषण निर्माण होत असून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम होत असल्याची तक्रार समोर आली आहे.
केळगाव येथील स्थानिक नागरिक संदीपभाऊ मुंगसे यांनी सांगितले की, कचरा डेपोमध्ये नियमितपणे कचरा जाळला जात असल्याने परिसरातील नागरिकांना श्वसनाचा त्रास, घसा खवखवणे, डोळ्यांची जळजळ, दम लागणे यांसारख्या आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना या धुराचा मोठा फटका बसत आहे.
स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, आळंदी नगरपरिषद प्रशासनाने कचरा व्यवस्थापनाच्या मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष करून कचरा जाळून मोकळे होण्याचा मार्ग स्वीकारला आहे. शासनाच्या विविध योजनांतून आणि तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होत असतानाही कचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक उपाययोजना प्रभावीपणे राबविल्या जात नसल्याची नाराजी नागरिक व्यक्त करत आहेत.
कचरा जाळल्यामुळे परिसरातील हवा प्रदूषित होत असून रोगराई पसरण्याचा धोका वाढला आहे. पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका निर्माण होत असताना संबंधित विभागांकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. अनेक वेळा तक्रारी, निवेदने आणि लक्षवेधी करूनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नसल्याचे स्थानिक रहिवासी सांगत आहेत.
नागरिकांच्या मते, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी तसेच नगरविकास विभागाने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन कचरा डेपोची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांसह संबंधित प्रशासनाकडून कचरा व्यवस्थापनाबाबत आवश्यक ती जबाबदारी पार पाडली जात नसल्याची तक्रारही नागरिकांनी केली आहे.
केळगाव व परिसरातील रहिवाशांनी प्रशासनाकडे वारंवार मागणी केली आहे की, कचरा जाळण्याची पद्धत तात्काळ बंद करून वैज्ञानिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित करावा. अन्यथा नागरिकांना तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो, असा इशाराही स्थानिकांकडून देण्यात आला आहे.
आता या वाढत्या प्रदूषणाच्या प्रश्नाकडे प्रशासन गांभीर्याने पाहणार का, की नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ असाच सुरू राहणार, असा प्रश्न परिसरातील नागरिक उपस्थित करत आहेत.
आळंदी नगरपरिषदेच्या कचरा डेपोमध्ये जाळला जाणारा कचरा व त्यातून निर्माण होणारा धूर; परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
