Home शिरूरमहाराष्ट्र जाते श्रमसंस्कृतीचे प्रतीक! – पद्मश्री गिरीश प्रभुणे

जाते श्रमसंस्कृतीचे प्रतीक! – पद्मश्री गिरीश प्रभुणे

सुंदर माझे जाते गं... कविसंमेलन संपन्न

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी प्रतिनिधी (दिनांक : ०८ जून २०२६) ‘जाते हे ग्रामसंस्कृती आणि श्रमसंस्कृतीचे प्रतीक आहे. बाई जात्यावर दळायला बसली की ओव्या सुचत आणि त्यातून आपले मौखिक लोकसाहित्य समृद्ध झाले!’ असे विचार ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी गोशाळा सभागृह, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे रविवार, दिनांक ०७ जून २०२६ रोजी व्यक्त केले. शब्दधन काव्यमंच आयोजित जात्यावर दळताना साहित्य विश्वातील पहिल्या ‘सुंदर माझे जाते गं…’ या अभिनव कविसंमेलनाचे उद्घाटन करताना गिरीश प्रभुणे बोलत होते. छाया कांकरिया अध्यक्षस्थानी होत्या; तसेच ज्येष्ठ साहित्यिक नंदकुमार मुरडे, प्रबोधनकार शारदा मुंडे, जात्यावरील ज्येष्ठ ओव्या गायिका इंदुबाई कणसे, शब्दधन काव्यमंचाचे अध्यक्ष सुरेश कंक यांची प्रमुख उपस्थिती होती; तर बाळकृष्णाच्या वेषभूषेतील सानवी स्वप्निल चव्हाण ही बालिका सर्वांच्या आकर्षण अन् कौतुकाच्या केंद्रस्थानी होती. सजवलेल्या जात्याचे मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन, सुभाष चव्हाण यांनी केलेले मंगलमय शंखवादन, संत जनाबाईंच्या ओव्यांचे गायन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर झालेल्या कविसंमेलनात संजय गमे, शोभा जोशी, तानाजी एकोंडे, राधाबाई वाघमारे, बाळकृष्ण अमृतकर, मेहमुदा शेख, आय. के. शेख, अंबादास रोडे, फुलवती जगताप, कैलास भैरट, संगीता सलवाजी, शामराव सरकाळे, कल्पना बंब, सूर्यकांत भोसले, शामला पंडित, जयश्री श्रीखंडे, सुभाष चटणे यांनी बाळकृष्णासमवेत जात्यावर दळण दळताना स्वरचित गेय कवितांचे सादरीकरण केले; तर इंदुबाई कणसे यांनी पारंपरिक ओव्यांचे गायन केले. नारायण कुंभार यांनी कविसंमेलनाचा लालित्यपूर्ण शैलीतून आढावा घेतला. शारदा मुंडे यांनी प्रबोधनपर मनोगत व्यक्त केले. नंदकुमार मुरडे यांनी प्रभावी कथाकथन केले. छाया कांकरिया यांनी अध्यक्षीय मनोगतातून शब्दधन काव्यमंचाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाविषयी गौरवोद्गार काढले. याप्रसंगी संयुजा टाटिया यांच्या वतीने पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् मधील विद्यार्थ्यांना छत्री वाटप करण्यात आले. मीरा कंक, अशोकमहाराज गोरे, अण्णा गुरव, बाळासाहेब साळुंके, दत्ता कांगळे, अरुण घोडके, सुधीर भालेराव, शोभना भालेराव, मानसी चिटणीस यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. मुरलीधर दळवी यांनी आभार मानले.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?