पिंपरी,(दिना़कक २ मे २०२६ ) देशातील महत्त्वाच्या जनगणना २०२७ मोहिमेला महाराष्ट्रात १ मेपासून सुरुवात झाली असून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर सौ.शर्मिला राजेंद्र बाबर यांनी स्वतः ऑनलाईन स्वगणना पूर्ण करत या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला आहे. त्यांच्या या पुढाकारामुळे नागरिकांमध्ये जनजागृतीला चालना मिळाली असून अधिकाधिक नागरिकांनी या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
उपमहापौर शर्मिला बाबर यांनी https://se.census.gov.in या संकेतस्थळावर भेट देत आवश्यक माहिती अचूकपणे भरून स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली. सर्व प्रश्नांची विश्वासार्ह माहिती नोंदवत त्यांनी यशस्वी नोंदणी करून ‘सेल्फ एन्युमरेशन आयडी (SE ID)’ प्राप्त केला आहे.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की,“जनगणना ही देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. प्रत्येक नागरिकाकडून मिळणारी अचूक व विश्वासार्ह माहिती शासनाच्या नियोजनासाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने स्वगणना पूर्ण करणे आवश्यक आहे.”
१ मे ते १५ मे २०२७ या कालावधीत स्व-जनगणना सुविधा उपलब्ध असून नागरिकांना घरबसल्या मोबाईल किंवा संगणकाच्या माध्यमातून ही प्रक्रिया सोप्या व सुरक्षित पद्धतीने पूर्ण करता येणार आहे. त्यानंतर १६ मे ते १४ जून दरम्यान प्रगणकांमार्फत घरोघरी भेट देऊन पुढील टप्प्यातील जनगणना प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
उपमहापौर शर्मिला बाबर यांनी सर्व पिंपरी चिंचवडकर नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, जनगणना म्हणजे देशातील प्रत्येक नागरिकाची अधिकृत नोंदणी असून याच माहितीच्या आधारे शाळा, रस्ते, रुग्णालये, पाणी, वीज, रोजगार तसेच विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबवल्या जातात. अचूक जनगणना म्हणजे वेगवान आणि सर्वसमावेशक विकासाचा पाया आहे.
केंद्र सरकारने सुरू केलेल्या स्व-जनगणना सुविधेअंतर्गत नागरिकांनी se.census.gov.in या संकेतस्थळावर जाऊन स्वतःची माहिती भरावी व प्राप्त करावा. त्यानंतर जनगणना अधिकारी भेट दिल्यावर केवळ स्व-गणना ओळख क्रमांक (SEID) दाखवून प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
नागरिकांनी निर्धास्तपणे सहभाग नोंदवावा, कारण दिलेली सर्व माहिती पूर्णपणे सुरक्षित व गोपनीय असून ती केवळ राष्ट्रनिर्माण व विकासासाठीच वापरली जाणार आहे.
चला, स्व-जनगणनेत सहभागी होऊया आणि देशाच्या विकासात आपला मोलाचा वाटा उचलूया असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
