by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी, दिनांक (२६ मार्च २०२६) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून प्लास्टिक कचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या दिशेने आणखी एक ठोस पाऊल उचलण्यात आले आहे. ‘समुदायांच्या माध्यमातून प्लास्टिक कृती स्थानिकीकरण (एलपीएसी)’ या अभिनव उपक्रमांतर्गत अत्याधुनिक प्लास्टिक कचरा संकलन वाहन आरोग्य विभागाला देण्यात आले. या उपक्रमामुळे शहरातील कचरा व्यवस्थापनाला नवी चालना मिळणार असून स्वच्छता अधिक प्रभावी होईल.

महापौर रवि लांडगे, उप महापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली तर उप आयुक्त डॉ.प्रदीप ठेंगल, सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे यांच्या अधिपत्याखाली दापोडी येथील विकेंद्रित साहित्य पुनर्प्राप्ती केंद्रात पार पडलेल्या या कार्यक्रमाला उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, क्षेत्रीय अधिकारी पूजा दूधनाळे, सहाय्यक आरोग्य अधिकारी अंकुश झिटे, श्रीराम गायकवाड, मुख्य आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी, आरोग्य निरीक्षक सचिन जाधव यांच्यासह युमिकोअर ऑटोकॅट इंडिया प्रा. लि. चे राजीव कदम, अभिषेक कुलकर्णी, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट यांच्या उत्कर्षा कवडी, प्राची मेढे, श्रुती जोशी, युनिसेफचे प्रतिनिधी जसप्रीत गुरुम, आनंद घोडके यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, युवक, महिला, नागरिक उपस्थित होते.

स्थानिक समुदायाच्या सक्रिय सहभागातून प्लास्टिक कचऱ्याचे संकलन, वर्गीकरण आणि पुनर्वापर अधिक परिणामकारक करण्याचा मुख्य उद्देश असलेल्या या प्रकल्पाची अंमलबजावणी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, मुंबई यांच्या माध्यमातून करण्यात येत असून, युनिसेफ महाराष्ट्र आणि युमिकोअर ऑटोकॅट इंडिया प्रा. लि. यांचे सहकार्य या उपक्रमाला लाभले आहे. विविध संस्थांच्या समन्वयातून साकारलेला हा उपक्रम शहरासाठी एक आदर्श मॉडेल ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. तसेच एलपीएसी प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा सादर करण्यात आला आणि नव्या संकलन वाहनाचे औपचारिक हस्तांतरण यावेळी करण्यात आले.

यानंतर मान्यवरांनी साहित्य पुनर्प्राप्ती केंद्राची पाहणी करून तेथील कार्यपद्धतीची माहिती घेतली. स्वयं-सहायता गटातील महिलांशी व विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या योगदानाचे कौतुक करण्यात आले आणि कचरा व्यवस्थापनातील त्यांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. तसेच नवीन संकलन वाहनामुळे पिंपरी चिंचवड शहरातील प्लास्टिक कचरा संकलन व प्रक्रिया अधिक वेगवान, कार्यक्षम आणि शाश्वत होणार आहे. नागरिकांच्या सक्रिय सहभागातून स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत शहर उभारणीच्या दिशेने हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे, अशी माहिती देखील यावेळी देण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्कर्षा कवडी यांनी तर सूत्रसंचालन प्राची मेढे यांनी केले.

banner

‘एलपीएसी’ सारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे कचरा व्यवस्थापनात नागरिकांचा थेट सहभाग वाढत असून शाश्वत आणि पर्यावरणपूरक शहर उभारणीस गती मिळत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनासाठी अशा उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन देत राहील.
प्लास्टिक कचरा व्यवस्थापन ही केवळ यंत्रणांची जबाबदारी नसून नागरिकांच्या सक्रिय सहभागाशिवाय ती पूर्ण होऊ शकत नाही. ‘एलपीएसी’ उपक्रमामुळे स्थानिक स्तरावर कचऱ्याचे संकलन, वर्गीकरण आणि पुनर्वापर सुलभ होणार असून पिंपरी चिंचवड शहर अधिक स्वच्छ आणि पर्यावरणपूरक बनविण्यास मोठी मदत होईल.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?