Home शिरूरमहाराष्ट्र पिंपरी चिंचवडला देशातील सर्वात स्वच्छ शहर बनवू – महापौर रवि लांडगे

पिंपरी चिंचवडला देशातील सर्वात स्वच्छ शहर बनवू – महापौर रवि लांडगे

स्वच्छ सर्वेक्षण २०२६ साठी पिंपरी चिंचवड महापालिका ‘ॲक्शन मोड’मध्ये; देशात अव्वल येण्याचा महापालिकेचा निर्धार.

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी: (दिनांक १२ मार्च २०२६)
देशातील सर्वात मोठे स्वच्छता सर्वेक्षण मानल्या जाणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण २०२६ ची प्रक्रिया सध्या देशभरात जोमाने सुरू असून पिंपरी चिंचवड महानगरपालिका यंदा देशात अव्वल स्थान मिळवण्यासाठी ‘ॲक्शन मोड’मध्ये कामाला लागली आहे. केंद्र सरकारच्या आवासन व शहरी कार्य मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या या सर्वेक्षणासाठी मार्च दरम्यान प्रत्यक्ष क्षेत्रीय पडताळणी सुरू होणार आहे.

या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छता उपक्रमांना अधिक वेग देत कचरामुक्त, स्वच्छ आणि सुंदर पिंपरी-चिंचवड घडविण्यासाठी महापालिका प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.

शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्यासाठी विविध विभागांची संयुक्त पथके तयार करण्यात आली असून कचरा विलगीकरण, स्वच्छ रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता यावर विशेष भर दिला जात आहे.

ही मोहीम पिंपरी चिंचवड महानगरपालिका महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल आणि सहा. आयुक्त किरणकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.

banner

कचरामुक्त शहरासाठी कठोर पावले

शहरात १०० टक्के कचरा विलगीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ओला , सुका, घरगुती घातक कचरा, सॅनिटरी कचरा वेगळा न करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्या, दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्याचे संकेत महापालिकेने दिले आहेत. तसेच कचरा वेळेवर उचलला जावा आणि सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढीग निर्माण होऊ नयेत यासाठी आरोग्य विभाग सतत देखरेख करत आहे.

शहरभर विशेष स्वच्छता मोहीम स्वच्छ सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील मुख्य रस्ते, चौक, बाजारपेठा आणि अंतर्गत रस्त्यांवर विशेष स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. कचरा कुंडीमुक्त परिसरासाठी विशेष स्वच्छता पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच सार्वजनिक आणि सामुदायिक स्वच्छतागृहांची दुरुस्ती, स्वच्छता आणि पाणी-वीज व्यवस्था सुरळीत ठेवण्यावरही प्रशासन लक्ष केंद्रित करत आहे.

विद्यार्थी व नागरिकांचा सहभाग
स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी शाळांमध्ये स्वच्छता स्पर्धा, रॅली आणि जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये कचरा विलगीकरण आणि स्वच्छता राखण्याबाबत जनजागृती केली जात आहे.

‘स्वच्छ शहर जोडी’ उपक्रम
यावर्षीच्या सर्वेक्षणात ‘स्वच्छ शहर जोडी’ हा नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याअंतर्गत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका इतर प्रगत शहरांच्या सर्वोत्तम पद्धतींचा अभ्यास करून त्या शहरात राबविण्याचा प्रयत्न करत आहे.

नागरिकांचा अभिप्राय ठरणार निर्णायक

स्वच्छ सर्वेक्षणात नागरिकांचा अभिप्राय शहराच्या क्रमवारीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वच्छता ॲप किंवा स्वच्छ भारत मिशनच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन सकारात्मक अभिप्राय नोंदवावा तसेच आपल्या परिसरातील स्वच्छता राखण्यासाठी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड शहराला देशातील सर्वात स्वच्छ शहरांमध्ये अग्रस्थानी आणण्याचा आमचा निर्धार आहे. स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल क्रमांक मिळवण्यासाठी महापालिका प्रशासनाबरोबरच नागरिकांचाही सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक नागरिकाने कचरा विलगीकरण करणे, परिसर स्वच्छ ठेवणे आणि स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.

स्वच्छ सर्वेक्षण २०२६ च्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छता व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. कचरा संकलन, विलगीकरण, प्रक्रिया आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता यावर विशेष भर देण्यात आला आहे. नागरिकांनी स्वच्छता ॲपवर सकारात्मक अभिप्राय नोंदवून आणि परिसर स्वच्छ ठेवून महापालिकेला सहकार्य करावे.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?