पिंपरी-चिंचवड, तळवडे | प्रतिनिधी
रुपीनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्ञानदीप विद्यालय, तळवडे येथील विद्यार्थिनी कु. स्वरांजली प्रवीण शिंदे हिने 2024-25 या शैक्षणिक वर्षात माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन करत पुणे जिल्ह्यामध्ये 102वा आणि पिंपरी-चिंचवड तालुक्यात 23वा क्रमांक पटकावला आहे.
याचबरोबर केंद्र शासनाच्या ‘इन्स्पायर अवॉर्ड’ योजनेतही तिच्या विज्ञान प्रकल्पाची निवड झाली असून, या दुहेरी यशामुळे तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संस्थेचे सचिव श्री. भसे सर, प्रा. गारगोटे सर, पर्यवेक्षिका वाणी मॅडम, श्री. वावरे सर, श्री. थोरात सर आणि सौ. शेख मॅडम यांनी तिचे विशेष कौतुक करून तिला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यालयानेही तिच्या मेहनतीला सलाम करत सर्व विद्यार्थ्यांसमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे.
स्वरांजलीच्या या यशामागे तिचा चिकाटीचा अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा महत्त्वाचा ठरल्याचे संस्थेने सांगितले.
