Home पिंपरी चिंचवड वाकड दत्तमंदिर रस्त्याचे काम पूर्ण होण्याकरिता आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली रहिवासी व महापालिका अधिकारी यांची संयुक्त बैठक

वाकड दत्तमंदिर रस्त्याचे काम पूर्ण होण्याकरिता आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली रहिवासी व महापालिका अधिकारी यांची संयुक्त बैठक

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

निवडणूक काळात दिलेल्या आश्वासनाची आमदार शंकर जगताप यांनी केली पूर्तता

वाकड, १ जून – वाकड दत्तमंदिर रस्त्याच्या रुंदीकरण, सुशोभीकरण आणि नागरिकसुविधा विकासासंदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) आणि वाकड-पिंपरी चिंचवड रहिवासी विकास व कल्याणकारी संस्थेच्या संयुक्त पुढाकारातून एक अत्यंत फलदायी बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत रस्त्याच्या प्रस्तावित डिझाईनबाबत सविस्तर चर्चा झाली आणि विविध सुधारणा सुचवण्यात आल्या.

या उपक्रमामागे चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांची संकल्पना असून, विकास आराखड्यात सर्व स्तरांतील नागरिकांचा सहभाग असावा, हा त्यांचा स्पष्ट उद्देश आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या रस्त्याच्या विकासासंदर्भात आमदार शंकर जगताप यांनी निवडणूक काळात नागरिकांना दिलेल्या आश्वासनाची त्यांनी पूर्तता केली आहे. त्यांनी सर्व संबंधित पक्षांना विश्वासात घेऊन विकास प्रक्रियेचा मार्ग सुकर केला आहे.

या बैठकीत वाकड दत्तमंदिर रस्त्यावरील विविध गृहनिर्माण सोसायट्यांचे प्रतिनिधी आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी, विशेषतः सहायक शहर अभियंता बापूसाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील टीम सहभागी झाली होती. मार्च २०२२ पासून सुरू असलेल्या या रस्त्याच्या प्रस्तावित कामांबाबत ही १६ वी बैठक होती.

banner

८ मार्च २०२५ रोजी स्थानिक रहिवाशांनी आमदार शंकर जगताप यांना हिरव्या पट्ट्यात देशी झाडांचे वृक्षारोपण, वाहनचालना व पार्किंगसाठी स्वतंत्र मार्गिका, सार्वजनिक जागांचा वापर यासह अनेक मागण्या सादर केल्या होत्या. आमदार जगताप यांनी त्या सकारात्मकपणे स्वीकारून महापालिकेला आवश्यक सूचना दिल्या. त्यानंतर या मुद्द्यांवर पुढील पाऊल उचलत, सचिन लोंढे यांच्या पुढाकाराने महापालिकेच्या शहर अभियंत्यांसोबत ही बैठक आयोजित करण्यात आली.

या बैठकीत स्थानिक देशी झाडांचे वृक्षारोपण, पदपथ व सायकल ट्रॅक बदल, परगोला व प्लाझा जागा उभारणी, पावसाचे पाणी झिरपवणारे पेव्हर्स, सशुल्क पार्किंग, सम-विषम पार्किंग पद्धती, बसण्यासाठी जागा, युटिलिटी डक्ट्स अशा तब्बल १४ मुद्द्यांवर सखोल विचारमंथन करण्यात आले. महापालिकेच्या अभियंता पथकाने यावर व्यावसायिक पद्धतीने सादरीकरण करत नागरिकांच्या सूचना ऐकून घेतल्या आणि काही बदल तात्काळ स्वीकारले.

या बैठकीला उपस्थित असलेल्या रहिवाशांनी महापालिकेच्या सहकार्याबद्दल तसेच आमदार शंकर जगताप यांच्या सक्रिय पाठबळाबद्दल आभार व्यक्त केले. आगामी काळात रस्त्याच्या कामांवर लक्ष ठेवण्यासाठी पाठपुरावा बैठक घेण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला.

या यशस्वी बैठकीमुळे वाकड दत्तमंदिर रस्त्याच्या विकासाच्या लढ्याला नवीन चालना मिळाली आहे. या लढ्यामागे वाकडमधील विविध गृहनिर्माण सोसायट्यांची एकी, आमदार शंकर जगताप यांचा सातत्याने मिळणारा पाठिंबा आणि नगरसेवक विनायक गायकवाड यांची २०२२ पासूनची खंबीर साथ हा महत्त्वाचा आधार राहिला आहे.

या बैठकीला सचिन लोंढे, तेजस्विनी सवाई, रोहित सावंत, प्रदीप बी., सतीश टी., संतोष क. यांच्यासह अनेक रहिवासी सहभागी झाले होते.

शहराचा नवीन विकास आराखडा तयार करताना नागरिकांचा थेट सहभाग हा पिंपरी चिंचवडसारख्या झपाट्याने वाढणाऱ्या शहरासाठी एक सकारात्मक पाऊल ठरत आहे.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?