पिंपरी, दि. १४ एप्रिल २०२५ – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची महती अनमोल आहे. शिक्षण, समता, न्याय या मुल्यांवर आधारित, त्यांनी कोट्यवधींचे आयुष्य घडवले आणि संविधाननिर्मितीपासून ते सामाजिक चळवळींपर्यंत प्रत्येक कार्यात परिवर्तन घडवले. त्यांचे विचार आजही समाजाच्या सर्वसमावेशक, उत्तरदायी आणि न्यायप्रिय प्रशासनासाठी प्रेरणा देतात, असे मत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केले.
आज, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस, भीमसृष्टी तसेच एच. ए क़ॉलनी आणि दापोडी येथील पुतळ्यांस आयुक्त शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यावेळी म्हणाल्या, “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारमूल्य आणि संविधानामुळे देशातील लोकशाही खऱ्या अर्थाने बळकट झाली आहे. त्यांच्या कार्यामुळेच आज प्रत्येक नागरिकाला आपल्या हक्कांची जाणीव असून त्यांनी दिलेली विचारधारा ही आजच्या पिढीसाठी दीपस्तंभासारखी आहे. समता व बंधुभावाच्या शिकवणीचे पालन करून सर्वांगीण विकासासाठी त्यांनी दिलेले विचार संपूर्ण समाजाने जोपासावे.”
मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या कार्यक्रमास आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सहशहर अभियंता देवन्ना गट्टूवार, उप आयुक्त राजेश आगळे, अण्णा बोदडे, सचिन पवार, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता विनय ओव्हाळ, शशिकांत मोरे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कामगार नेते गणेश भोसले, तुकाराम गायकवाड उपस्थित होते.
भीमसृष्टी पिंपरी येथील कार्यक्रमास खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, शंकर जगताप, अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य अँड. गोरक्ष लोखंडे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार गौतम चाबुस्कवार, माजी महापौर योगेश बहल, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण अध्यक्ष सदाशिव खाडे, आणि विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते, महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक थोर समाजसुधारक, विधीतज्ञ, अर्थतज्ञ तसेच उत्तम लेखक आणि पत्रकार होते. त्यांचे योगदान राज्यघटना निर्मितीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून, त्यांचे विचार आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरले आहेत. “शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा” असा त्यांचा संदेश आजही प्रेरणादायक ठरतो.
सकाळी, भीमसृष्टी पिंपरी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर एकता कर्मचारी संघटनेच्या वतीने हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली.
