पुणे| प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग ६० वरील भीमाशंकर तळेघर-वाडा-राजगुरूनगर आणि जुन्नर-घोडेगाव-तळेघर या दोन विभागांच्या पेव्हड शोल्डरसहित इंटरमिडिएट लेनपासून २-लेन रुंदीकरण, पुनर्बांधणी व अपग्रेडिंगसाठी २३४९.३२ कोटी रुपयांच्या निधीसह केंद्रीय दळणवळण व वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांनी मंजुरी दिल्याची माहिती माजी खासदार व पुणे म्हाडाचे अध्यक्ष राज्यमंत्री शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
या संदर्भात माजी खासदार आढळराव पाटील म्हणाले की, या विभागाचा खासदार म्हणून सन २०१४ पासून केंद्रीय भारतमाला ज्योतिर्लिंग जोडणी योजनेतून या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळवून देण्याबरोबरच केंद्र शासनाचा निधी मिळवण्यासाठी मी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करत आलो. तसेच लोकसभेतही यासाठी आग्रही मागणी केली होती. सन २०१७ मध्ये चांदणी चौक येथील पुलाच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी मा. शरद पवार साहेब, गिरीश बापट साहेब आणि मी सदर कार्यक्रमास उपस्थित असताना या ज्योतिर्लिंग जोडणी महामार्गाचे भूमीपूजन केले होते. नितीनजी गडकरी यांना या महामार्गाचे महत्त्व पटवून देताना येथील आदिवासी बहुळ व डोंगरळ भागाचा विकास होण्यासाठी देखील हा रस्ता किती महत्त्वाचा आहे, त्यामुळे पर्यटनाला कशी चालना मिळू शकेल आदी बाबतीत गडकरी साहेबांना संक्षिप्तपणे अवगत केले होते. माझ्या कारकिर्दीत मी या महामार्गासाठी महत्वाची बहुतांशी मंजुरी प्रक्रिया केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठपुरावा करून पार पाडली असल्याचे आढळराव पाटील यांनी स्पष्ट केले.
१२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर व जुन्नर शहराजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेला ऐतिहासिक शिवनेरी किल्ला हे या रस्ते प्रकल्पातील महत्त्वाचे दुवे आहेत. या प्रकल्पामुळे अष्टविनायक मंदिरांपैकी श्री क्षेत्र ओझर येथील श्री गणेश मंदिर, भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य, डिंभे धरण आणि चासकमान धरण यांच्याशी कनेक्टिव्हिटी सुधारेल. तसेच पर्यटनाला चालना मिळून स्थानिकांच्या रोजगारात वाढ होईल असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना माजी खासदार व पुणे म्हाडाचे अध्यक्ष राज्यमंत्री शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.
