भविष्यात देखील शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मोहीम सुरूच राहणार- आयुक्त शेखर सिंह
पिंपरी, दि. १७ मे २०२५ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कं क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या चिखली येथील गट क्रमांक ९० मधील इंद्रायणी नदी लगतच्या निळ्या पूररेषेत उभारण्यात आलेल्या अनधिकृतपणे बांधकाम केलेल्या ३६ बंगल्यांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. आज (१७ मे ) रोजी करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये १.८ एकर भूभागावरील सुमारे ६३,९७० चौरस फूट क्षेत्रफळ असलेली अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी कारवाई स्थळाची पाहणी पाहणी केली.

शहराच्या बाजूने जाणाऱ्या इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेच्या आत अनधिकृत पद्धतीने बांधण्यात आलेल्या बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्याचा निर्णय हरित लवादने दिला होता. या विरोधात रहिवाश्यांनी सर्वोच्च न्यालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने हरित लवादने दिलेला निर्णय कायम ठेवल्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

चिखली येथील सदर कारवाईमध्ये अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम, उपआयुक्त मनोज लोणकर, सीताराम बहुरे, राजेश आगळे, सह शहर अभियंता नितीन देशमुख, संजय खाबडे, क्षेत्रीय अधिकारी शीतल वाकडे, अमित पंडित, अजिंक्य येळे,पूजा दूधनाळे, श्रीकांत कोळप, किशोर ननावरे, सहाय्यक आयुक्त, उमेश ढाकणे, महेश वाघमोडे, नाना मोरे, कार्यकारी अभियंता सुर्यकांत मोहिते, सुनील बागवानी, विजय सोनवणे, लक्ष्मीकांत कोल्हे, विजय वायकर, शिवराज वाडकर, सुनीलदत्त नरोटे, यांच्यासह उपअभियंता, कनिष्ठ अभियंता सहभागी झाले होते.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उपआयुक्त डॉ. शिवाजी पवार, बापूसाहेब बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल कोळी, राजेंद्रसिंह गौर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली या परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेच्या आत बांधण्यात आलेल्या आर.सी.सी. बांधकामांमुळे पावसाळ्यात नदीला येणाऱ्या पुरामुळे तेथील नागरिकांना यांचा मोठा फटका बसू शकतो. म्हणून नदीकाठचे अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग आणि धडक कारवाई पथकांमार्फत ३६ बंगल्यावर कारवाई करण्यात आली.
गट क्रमांक ९० मधील अनधिकृत बांधकाम निष्कासनाच्या कारवाईमध्ये सहभागी यंत्रणा..
अतिक्रमण धडक कारवाई पथकामध्ये ७ कार्यकारी अभियंता, २२ कनिष्ठ अभियंता, २२ बीट निरीक्षक, १६८ महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान, ४०० पोलीस आणि १२० मजूर कर्मचारी या कारवाईमध्ये सहभागी झाले होते. १५ पोकलेन, ३ जेसीबी यांचा वापर निष्कासन कारवाईमध्ये करण्यात आला. शिवाय २ अग्निशमन वाहने आणि ४ रुग्णवाहिका, कारवाईच्या चित्रीकरणासाठी १९ व्हिडीओग्राफर देखील येथे तैनात करण्यात आले होते. महापालिका यंत्रणेसह पोलीस, वीज वितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी देखील या कारवाईमध्ये सहभागी झाले होते.
पिंपरी चिंचवड शहरात बांधकाम परवानगी घेऊनच बांधकामे करावीत. अनधिकृत व विना परवाना बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात येईल. -शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.
