आळंदी प्रतिनिधी (दिनांक १४ नोव्हेंबर २०२६) कुबेर हॉलमध्ये दिमाखदार वातावरणात श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी देवाची व “ओळख श्री ज्ञानेश्वरी-एक परिवार” आयोजित ओळख श्री ज्ञानेश्वरी पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन तसेच या उपक्रमात सहभागी शैक्षणिक संस्था पदाधिकारी, प्राचार्य – अध्यापकांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.
या वेळी ओळख श्री ज्ञानेश्वरीची या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी ह.भ.प.. डॉ. नारायण महाराज जाधव, संस्थानचे प्रमुख विश्वस्त ह. भ. प. डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त ह.भ.प पुरुषोत्तम महाराज पाटील, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे, देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, ह.भ.प. सुभाष गेटे, ह.भ.प. उमेश बागडे, ह. भ.प. वासुदेव महाराज शेवाळे, माजी नगराध्यक्ष बबनराव कु-हाडे, संस्थेचे विश्वस्त अशोक कु-हाडे, राज्यातून आलेले अनेक संस्थांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
ओळख श्री ज्ञानेश्वरी या पुस्तकाच्या तिसऱ्या वृत्तीचे प्रकाशन उत्साहात झाले. मान्यवरांच्या हस्ते अडीचशे शाळां मधील प्रमुखांचा सन्मान माऊलींची मूर्ती, उपरणे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पसायदानची प्रतिमा, प्रशस्ती पत्रक देऊन करण्यात आला.
श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी,श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती, आळंदी पत्रकार संघ यांच्या सहभागातून सुमारे सहा वर्षांपूर्वी श्री ज्ञानेश्वर विद्यालयात सुरू झालेला हा उपक्रम आज राज्यातील अडीचशे शाळांमध्ये सुरू झाला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ओळख ज्ञानेश्वरी च्या पुस्तकातून शालेय विद्यार्थ्यांना शालेय वयात जीवनमूल्य आणि संस्काराचे धडे दिले जातात. प्रथम सत्रात या प्रसंगी प्रकाश काळे यांनी प्रास्ताविकात या उपक्रमाच्या संदर्भात सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचा आणि उपक्रमाचा हेतू सांगितला.
आमदार बाबाजी काळे, डॉ. नारायण महाराज जाधव, डॉ.भावार्थ देखणे, सुभाष गेटे, सत्कारार्थींच्या वतीने काही संस्था चालकांनी मनोगत व्यक्त करत उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
द्वितीय सत्रामध्ये संत साहित्याचे गाढे अभ्यासक ह. भ.प. अभय टिळक यांचेसह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उर्वरित संस्था, प्राचार्य, अध्यापकांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी डॉ.अभय टिळक यांनी आपल्या मनोगतात हा उपक्रम नुसता शाळांच्या संख्येने न वाढता सर्वांगाने वाढावा व त्याचा फायदा विद्यार्थ्यांना व समाजाला व्हावा हे सांगताना या करिता दर तीन महिन्यांनी अध्यापकां करिता कार्यशाळेचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीधर घुंडरे यांनी केले. या निमित्ताने सर्व उपस्थितांना संस्थानच्या वतीने महाप्रसादाचा आयोजन करण्यात आले. उमेश बागडे यांच्या आवाजातील पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
