पिंपरी, (दिनांक १३ एप्रिल २०२६ ) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय संबंधांवरील विचार आजही आधुनिक भारताच्या परराष्ट्र धोरणाला दिशा देणारे ठरत असून, जागतिकीकरणाच्या युगात शिक्षण व रोजगाराच्या नव्या संधी शोधताना त्यांच्या दूरदृष्टीची प्रासंगिकता अधिक ठळकपणे जाणवते. सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक समतेचा आग्रह धरणाऱ्या त्यांच्या विचारसरणीमुळे भारतीय युवकांनी जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होण्यासाठी व्यापक दृष्टीकोन स्वीकारणे आवश्यक आहे, असे मत ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय संबंधांवरील विचार आणि सद्यस्थिती तसेच परदेशातील शिक्षण व रोजगार संधी’ या विषयावर आयोजित परिसंवादात तज्ज्ञांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘विचार प्रबोधन पर्व २०२६’ अंतर्गत ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय संबंधांवरील विचार आणि सद्यस्थिती तसेच परदेशातील शिक्षण व रोजगार संधी’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
या परिसंवादात परदेशातून नंदू मोरे (बेल्जियम), डॉ. शैलेश कोळेकर (डेन्मार्क), रेवा रॉय (कॅनडा), विरेंद्र घुटके (स्वीडन), धम्मचारी सुदिप्ता (इंग्लंड) यांनी दृकश्राव्य माध्यमाद्वारे सहभाग घेतला तर प्रा. डॉ. संजय खोब्रागडे (नागपूर), प्रा. केशव वाघमारे (संशोधक), प्रा. डॉ. अशोक गायकवाड (प्राचार्य, कला, वाणिज्य, बी.बी.ए. महाविद्यालय, वडगाव मावळ), प्रा. डॉ. नितीश नवसागरे (विधी महाविद्यालय, पुणे), प्रा. रोनके राम (पंजाब विद्यापीठ), प्रा. विवेक कुमार (जेएनयू, दिल्ली) हे देखील उपस्थित होते.
यावेळी महापालिकेचे उपायुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड उपस्थित होते.
परदेशातील शिक्षण व रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन करताना नंदू मोरे यांनी जागतिक स्तरावर बदलत असलेल्या कौशल्यांच्या गरजेवर भर दिला. प्रोग्राम मॅनेजमेंट, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), अॅनिमेशन, डेटा सायन्स आणि डेटा ऑटोमेशन या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. यासोबतच उत्तम संवादकौशल्य (कम्युनिकेशन स्किल्स) हे जागतिक पातळीवर यश मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कॅनडामधील रोजगाराच्या संधींबाबत माहिती देताना रेवा रॉय यांनी नव्या तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करण्याची गरज अधोरेखित केली. वेगाने बदलणाऱ्या जागतिक रोजगार बाजारात टिकून राहण्यासाठी सतत अद्ययावत राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कौशल्यविकास आणि तांत्रिक प्रावीण्य यांच्या आधारे भारतीय युवकांसाठी परदेशात मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
इंग्लंडमध्ये शिक्षण घेताना आलेल्या अनुभवांचे कथन करताना धम्मचारी सुदिप्ता यांनी परदेशातील शैक्षणिक प्रवासातील आव्हाने मांडली. वंचित समाजाच्या प्रश्नांना जागतिक स्तरावर मांडण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमुळे अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच परदेशातही बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते, असे त्यांनी नमूद केले.
युरोपियन देशांमध्ये शिक्षण घेतल्यानंतर येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाययोजनांबाबत विरेंद्र घुटके यांनी मार्गदर्शन केले. प्रत्येक देशातील रोजगाराच्या संधी समजून घेताना स्थानिक भाषा शिकणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शिक्षणादरम्यान इंटर्नशिप करण्याचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी प्रत्यक्ष अनुभवातून कौशल्यविकासाला चालना मिळते, असे स्पष्ट केले.
प्रा. डॉ. संजय खोब्रागडे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनाचा विचार करता भारताच्या परराष्ट्र धोरणात समता व न्याय या मूल्यांना विशेष स्थान मिळाले आहे. जागतिक स्तरावर सामाजिक न्यायाचा विचार अधिक प्रभावीपणे मांडण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीचा अभ्यास करताना जागतिक घडामोडींकडे चिकित्सक दृष्टीकोनातून पाहणे आवश्यक असल्याचे प्रा. केशव वाघमारे यांनी सांगितले. संशोधनाच्या माध्यमातून भारतीय युवकांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण करावी, असे त्यांनी आवाहन केले.
प्रा. डॉ. अशोक गायकवाड यांनी विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणासोबतच जागतिक कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे असल्याचे सांगितले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन शिक्षणाचा उपयोग समाज परिवर्तनासाठी करावा, असे त्यांनी अधोरेखित केले.
प्रा. डॉ. नितीश नवसागरे यांनी आंतरराष्ट्रीय कायदा आणि मानवाधिकारांच्या दृष्टीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही मार्गदर्शक ठरतात, असे मत मांडले. विद्यार्थ्यांनी विधी क्षेत्रात जागतिक संधींचा अभ्यास करून स्वतःला सक्षम करावे, असेही त्यांनी सांगितले.
जागतिक पातळीवर सामाजिक विषमता कमी करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आवश्यकता असल्याचे प्रा. रोनके राम यांनी नमूद केले. आंतरराष्ट्रीय मंचांवर वंचित घटकांचे प्रश्न मांडण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले.
युरोपमधील शिक्षण व संशोधनाच्या संधींबाबत माहिती देताना डॉ. शैलेश कोळेकर यांनी कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. परदेशात यश मिळवण्यासाठी शिस्त, सातत्य आणि जागतिक दृष्टीकोन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
केशव वाघमारे यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा संदर्भ देत १९२७ मध्ये झालेल्या महाड सत्याग्रहातील त्यांच्या ऐतिहासिक भूमिकेचा उल्लेख केला. या सत्याग्रहातील भाषणात बाबासाहेबांनी समतेच्या लढ्याची तुलना फ्रान्समधील वर्साय येथील समतेच्या चळवळीशी केली होती, असे त्यांनी सांगितले. तसेच लोकशाही मूल्यांना प्राधान्य देणाऱ्या देशांशी संबंध प्रस्थापित करण्याची बाबासाहेबांची ठाम भूमिका होती, असे नमूद करत त्यांनी आंबेडकरी विचारांची जागतिक दृष्टी स्पष्ट केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त अण्णा बोदडे यांनी केले.
…..
*गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या गझलांनी रसिक मंत्रमुग्ध*
विचार प्रबोधन पर्वात दुसऱ्या दिवशी सायंकाळच्या सत्रात गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या गझलांचे सादरीकरणाने झाले. त्यांच्या सुरेल आणि भावपूर्ण गायकीने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. गझलांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक जाणिवा आणि मानवी मूल्यांचा वेध घेतला. यानंतर सुप्रसिद्ध गायक रवींद्र खोमणे, अमोल यादव, सोमनाथ फटाके व सहकाऱ्यांनी ‘भीम उत्सव’ अंतर्गत महामानवांच्या विचारांना वंदन करणारी प्रेरणादायी गीते सादर केली. या गीतांमधून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करत समता, बंधुता आणि न्याय यांचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमात संगीत, विचार आणि समाजप्रबोधन यांचा सुरेख संगम अनुभवायला मिळाला. उपस्थितांनी कलाकारांच्या सादरीकरणाला टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
….
*प्रबोधन पर्वात मंगळवार, १४ एप्रिल २०२६ रोजी होणारे कार्यक्रम*
सकाळी ६ वाजता : महामानवांना संगीतमय अभिवादन – संतूर आणि सितार वादनाची जुगलबंदी (सादरकर्त्या- वहाने सिस्टर्स, उज्जैन, मध्यप्रदेश)
सकाळी ८ वाजता : युगपुरूष (गीत गायनाचा सांस्कृतिक कार्यक्रम, सादरकर्ते – सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक नागसेन सावदेकर आणि कुणाल वराळे )
सकाळी ९ वाजता : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन (हस्ते – महापौर रवि लांडगे, स्थळ – मनपा भवन)
सकाळी ९.१५ वाजता : क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पिंपरी येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन
सकाळी ९.३० वाजता : वंदना व समता सैनिक दलाची मानवंदना (संयोजन – भारतीय बौद्ध महासभा)
सकाळी ९.३० वाजता : नृत्य कला फ्लॅश मॉब (सादरकर्ते – दिया बनसोडे आणि सहकारी )
सकाळी ९.३० वाजता : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पिंपरी एच.ए.कॉलनी येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन
सकाळी ९.४५ वाजता : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दापोडी येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन
सकाळी १० वाजता : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पिंपरी येथील पुतळ्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी (आयोजक – एकता कर्मचारी संघटना)
सकाळी १०.३० वाजता : तारपावादक पद्मश्री भिकल्या धिंडा आणि सहकारी यांच्या वतीने महामानवांना आदिवासी कलाविष्कारातून अभिवादन (सादरकर्ते – तारपा आदिवासी नृत्य पथक, वाळवंडा, ता. जव्हार, जि. पालघर)
सकाळी ११ वाजता : सांस्कृतिक शाहिरी जलशाचा कार्यक्रम शाहिरी भीमगर्जना (सादरकर्ते – युवा शाहीर गंधर्व पृथ्वीराज देवानंद माळी सांगलीकर आणि सहकारी)
दुपारी १२.३० वाजता : आंबेडकरी चळवळीतील गायकांचा जीवनपट साकारणारा संगीतमय कार्यक्रम (सादरकर्ते – सुप्रसिद्ध गायक संदेश विठ्ठल उमप, प्रविण डोणे, कडूबाई खरात, अमोल घोडके, ओमकार घाडगे आणि सहकारी)
दुपारी २ वाजता : गीत गायन (सादरकर्ते –चंद्रकांत शिंदे, गायत्री शेलार, राधा खुडे, चित्रसेन भवार)
दुपारी ४ वाजता : प्रबोधनात्मक किर्तनाचा कार्यक्रम (सादरकर्ते – प्रबोधनकार सप्तखंजिरी वादक डॉ. रामपाल धारकर, अमरावती)
सायंकाळी ५.३० वाजता : गीत गायन (सादरकर्ते -अजय देहाडे आणि सारेगमप फेम विनोद गोडबोले)
सायंकाळी ७.३० वाजता : ट्रीब्युट टू महात्मा फुले ऍन्ड डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑन व्हील्स (महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नृत्य संगीतातून अनोखे अभिवादन, सादरकर्ते – राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉ. सय्यद पाशा आणि भारतातील नामवंत दिव्यांग कलाकार)
रात्री ९.३० वाजता : शौर्यगाथा महामानवांची (लोककलेवर आधारित ४० कलाकारांनी सजलेला पारंपरिक वाद्यवृंदाचा संगीतमय अविष्कार, सादरकर्ते – शेखर नवतरे आणि सहकारी)
