Home शिरूरमहाराष्ट्र महापौर रवि लांडगे यांच्या कार्यकाळाला एक महिना पूर्ण.

महापौर रवि लांडगे यांच्या कार्यकाळाला एक महिना पूर्ण.

शहरातील प्रमुख प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याचा निर्धार.

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी,(दिनांक ६ मार्च २०२६) महापौर पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर गेल्या एका महिन्यात शहरातील विविध भागांना भेटी देत नागरिकांच्या समस्या तसेच नगर सदस्यांनी मांडलेल्या मुद्द्यांची प्रत्यक्ष माहिती घेतली आहे. या भेटीदरम्यान शहरातील प्रमुख प्रश्नांची यादी तयार करण्यात आली असून त्यावर टप्प्याटप्प्याने काम सुरू करण्यात आले आहे. नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि वैद्यकीय सुविधांशी संबंधित समस्यांवर महापालिकेच्या माध्यमातून प्रभावी उपाययोजना करण्यावर भर देण्यात येत आहे, अशी माहिती महापौर रवि लांडगे यांनी दिली.

६ फेब्रुवारी २०२६ रोजी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौरपदी रवि लांडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती. त्यांच्या महापौर पदाच्या कार्यकाळाला एक महिना पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

या परिषदेस उपमहापौर शर्मिला बाबर,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

महापौर रवि लांडगे यांनी शहरातील विविध विकासकामांचा तसेच नागरिकांच्या मूलभूत समस्यांच्या सोडवणुकीसंदर्भातील पुढील नियोजनाचा आढावा माध्यमांसमोर मांडला.

banner

महापौर रवि लांडगे म्हणाले,शहरातील पाणीपुरवठ्याच्या समस्येबाबत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्याने या विषयाला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार शहरातील चिखली व आकुर्डी येथील जलशुद्धीकरण केंद्रांना भेट देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतला. पाणीपुरवठा अधिक कार्यक्षम करण्यासाठी तसेच नागरिकांना सुरळीत पाणी उपलब्ध होण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. शहरात वाढत चाललेल्या भटक्या श्वानांच्या प्रश्नावर देखील लवकरच ठोस उपाययोजना करण्यात येणार आहेत. यासाठी शहरातील विविध ठिकाणी श्वान संगोपन केंद्र उभारणे, प्रत्येक विभागीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात श्वान पकडण्यासाठी विशेष वाहने उपलब्ध करून देणे तसेच या विषयावर प्राणीमित्र आणि संबंधित स्वयंसेवी संस्थांसोबत बैठक आयोजित करून सर्वसमावेशक धोरण तयार करण्यात येणार आहे, असे देखील ते म्हणाले.

क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी पिंपरी चिंचवड शहरातील अण्णासाहेब मगर स्टेडियम खासगी तत्त्वावर विकसित करून तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे अत्याधुनिक स्टेडियम उभारण्याचा मानस असल्याचेही महापौरांनी सांगितले. या माध्यमातून शहरातील क्रीडापटूंना उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने शहरातील प्रत्येक उद्यानामध्ये ‘ऑक्सिजन सेंटर’ उभारण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार असून या उपक्रमात नागरिकांचा सक्रिय सहभाग घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. शहरातील वाढते प्रदूषण लक्षात घेता हरित उपक्रमांना अधिक चालना देण्यावर महापालिकेचा भर राहणार असल्याचे महापौर रवि लांडगे यांनी स्पष्ट केले.

याशिवाय येत्या काळात राज्य शासन व महापालिकेच्या संयुक्त माध्यमातून शहरात दहा महत्त्वाचे विकास प्रकल्प राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये कचरा व्यवस्थापन,प्रदूषण नियंत्रण आणि शहराच्या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा या मुद्द्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.कचरा व्यवस्थापनाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी विदेशातील आधुनिक संकल्पना आणि तंत्रज्ञानाचा अभ्यास करून त्या शहरात राबविण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले.

तसेच शहरातील महत्वाकांक्षी ‘अजित सृष्टी’प्रकल्प उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या संकल्पनेनुसार पुढे नेण्यात येणार असल्याची माहितीही महापौर रवि लांडगे यांनी यावेळी दिली.

येत्या काही दिवसांत शहरातील सर्व विभागीय कार्यालयांना भेट देऊन प्रत्येक विभागाचा सखोल आढावा घेतला जाणार असून नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन सोडविण्यावर महापालिका प्रशासन भर देणार असल्याचे मत महापौर रवि लांडगे यांनी व्यक्त केले.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?