Home पिंपरी चिंचवड फुले सृष्टी प्रकल्पाच्या कामाला गती देण्याची मागणी

फुले सृष्टी प्रकल्पाच्या कामाला गती देण्याची मागणी

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी-चिंचवड, 20 मार्च 2025: महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या ‘फुले सृष्टी’ प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू असल्याने सामाजिक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सन 2021 पासून सुरू असलेले हे काम अद्याप पूर्णत्वास पोहोचलेले नाही, तसेच त्याच्या दर्जाबाबतही गंभीर तक्रारी समोर येत आहेत.

कामाचा दर्जा निकृष्ट, सुरक्षेचा अभाव!

महानगरपालिकेच्या ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय परिसरात सुरू असलेल्या या स्मारक प्रकल्पात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे पूर्णाकृती पुतळे, जीवनचरित्र दर्शवणाऱ्या न्यूरल्स, तसेच आकर्षक स्थापत्य उभारण्याची योजना होती. मात्र, वेळोवेळी बैठका होऊनही संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांनी कामाला वेग दिलेला नाही.

विशेष म्हणजे सदर प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी नियुक्त केलेले रक्षक जागेवर दिसत नाहीत. परिसरात अस्वच्छता वाढली असून, कचरा साचल्यामुळे असामाजिक घटकांचे प्रमाण वाढत आहे. स्थानिक नागरिकांनी येथे मद्यपान आणि इतर गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत, ज्यामुळे या ऐतिहासिक स्थळाची पावित्र्यता धोक्यात आली आहे.

banner

सामाजिक संघटनांची मागणी – ८ दिवसांत बैठक व ११ एप्रिलपर्यंत उद्घाटन

या स्थितीवर नाराज होत, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक समिती, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, बारा बलुतेदार महासंघ, ओबीसी संघर्ष समिती आणि इतर महत्त्वाच्या सामाजिक संघटनांनी तातडीने पाऊल उचलण्याची मागणी केली आहे. त्यांनी महापालिका आयुक्तांना पत्र देत ८ दिवसांत सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलवावी आणि कामाच्या प्रगतीचा आढावा घ्यावा, अशी विनंती केली आहे.

यासोबतच, येत्या ११ एप्रिल २०२५ रोजी क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंतीदिनी या प्रकल्पाचे भव्य उद्घाटन करण्यात यावे, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. आंदोलन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी जर प्रशासनाने योग्य पावले उचलली नाहीत, तर मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

महापालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!

स्मारकाचे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रशासनाने स्पष्ट धोरण आखले पाहिजे, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे. महानगरपालिकेच्या निधीतून सुरू असलेला प्रकल्प विलंबित होणे आणि त्याचा दर्जा घसरणे, ही निष्काळजीपणाची स्पष्ट लक्षणे आहेत. प्रशासनाने तत्काळ बैठक बोलावून आवश्यक सुधारणा कराव्यात आणि फुले सृष्टीचे लवकरात लवकर उद्घाटन व्हावे, अशी सर्वसामान्य नागरिकांची आणि सामाजिक संघटनांची मागणी आहे.

हा प्रकल्प केवळ पिंपरी-चिंचवडच नव्हे, तर महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात एक महत्त्वाची ठेव ठरेल. प्रशासनाने त्वरित पावले उचलून हा ऐतिहासिक प्रकल्प दर्जेदार आणि भव्य स्वरूपात पूर्ण करावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?