पिंपरी, ०३ फेब्रुवारी २०२५ : पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांच्या तक्रारी, अडचणी यांची न्याय व तत्परतेने सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून लोकशाही दिन शासनस्तरावर राबविण्यात येतो. लोकाभिमुख गतिमान प्रशासनाच्या दृष्टिने या उपक्रमाचे प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी तसेच महापालिका प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद वाढीसाठी आता महापालिकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. याबाबतचे परिपत्रक महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या स्वाक्षरीने सामान्य प्रशासन विभागाला निर्गमित केले आहे.
महापालिका अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली होणार लोकशाही दिन
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित केला जाणारा हा लोकशाही दिन अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली राबवला जाणार आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त (१) यांच्याकडे फेब्रुवारी, मे, ऑगस्ट आणि नोव्हेंबर अशा चार महिन्यांचा कालखंड सोपवण्यात आला आहे. अतिरिक्त आयुक्त (२) यांच्याकडे मार्च, जून, सप्टेंबर आणि डिसेंबर यांच्या चार महिन्यांची जबाबदारी असेल. तर, अतिरिक्त आयुक्त (३) यांच्याकडे एप्रिल, जुलै, ऑक्टोबर आणि जानेवारी अशा चार महिन्यांचे अध्यक्षपद असेल. नागरी सुविधा केंद्राचे विभागप्रमुख हे लोकशाही दिनाचे समन्वय अधिकारी म्हणून कामकाज पाहतील. प्रशासकीय कामकाजाच्या अनुषंगाने आवश्यक तरतुदींचा अंतर्भाव करायचा असल्यास अथवा निर्णय घ्यायचे असल्यास त्याकरीता समन्वय अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. लोकशाही दिनाची माहिती नागरिकांना उपलब्ध करून देणे, प्राप्त निवेदनावरील कार्यवाहीचे विविधस्तरावरील संनियंत्रण करण्यासाठी समन्वय अधिकाऱ्यांमार्फत आज्ञावली विकसीत केली जाणार आहे. समन्वय अधिकाऱ्यांमार्फत लोकशाही दिनाकरीताचे विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच विहित नमुन्यातील अर्ज नागरी सुविधा केंद्राच्या बाहेर लावण्यात येतील. समन्वय अधिकाऱ्यांमार्फत प्रत्येक महिन्याला कार्यक्रमाचे स्थळ आणि वेळ निश्चित करून त्याबाबत नागरिकांना विविध माध्यमांद्वारे अवगत केले जाणार आहे.
अर्ज स्वीकृतीचे निकष
लोकशाही दिनासाठी दाखल करावयाच्या अर्जाच्या विहित नमुन्यातील प्रती नागरिकांना सहजतेने विनामूल्य उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी समन्वय अधिकाऱ्यांची असेल. विहित नमुन्यातील अर्ज करताना यामध्ये नमूद तक्रारीवजा निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असावे. हा अर्ज अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-४११०१८ यांच्या नावे असावा. नागरी सुविधा केंद्रांचे विभागप्रमुख तथा समन्वय अधिकाऱ्यांकडे विहित नमुन्यातील अर्ज अर्जदाराने १५ दिवस आधी दोन प्रतीत पाठवणे आवश्यक राहील. लोकशाही दिनाच्या दिवशी प्रत्यक्ष तक्रार अर्ज स्वीकारला जाणार नाही. महापालिकेच्या सारथी व क्षेत्रीय स्तरावरील जनसंवाद सभेच्या माध्यमातून तक्रार दाखल केली असल्यास तसेच अशा तक्रारीचे निराकरण झाले नसल्यास अशा तक्रारी लोकशाही दिनामध्ये स्वीकारल्या जातील.
कोणत्या विषयावरील अर्ज स्वीकारले जाणार नाहीत?
लोकशाही दिनासाठी न्यायप्रविष्ट प्रकरणे, महसूल/अपील प्रकरणे, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अंतिम उत्तर दिलेले आहे अथवा देण्यात येणार आहे, अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्ज, तक्रार अथवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज लोकशाही दिनाकरीता स्वीकृत करता येऊ शकणार नाहीत. असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी आठ दिवसांमध्ये पाठवून त्याबाबत अर्जदारास कळविले जाईल.
लोकशाही दिनास कोणत्या अधिकाऱ्यांनी हजर रहावे?
महापालिका अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या लोकशाही दिनास जिल्हाधिकारी यांच्यावतीने अपर जिल्हाधिकारी वा निवासी उपजिल्हाधिकारी, वाहतूक शाखेतील वरिष्ठ पोलिस अधिकारी, महापालिकेच्या विभागांचे विभागप्रमुख तसेच प्रशासकीय आवश्यकतेनुसार लोकशाही दिन समन्वयक अधिकाऱ्यांनी आमंत्रित केलेले अधिकारी या लोकशाही दिनास हजर असतील.
लोकशाही दिन केव्हा होणार नाही?
निवडणूक कालावधीत आचारसंहिता लागू असताना लोकशाही दिनाचे आयोजन केले जाणार नाही. लोकशाही दिनातील नागरिकांकडून प्राप्त झालेल्या अर्जाची पोचपावती विहित नमुन्यात देण्यात येणार आहे. लोकशाही दिनासाठी अर्ज स्वीकृत केल्यानंतर ज्या विभागाशी संबंधित तक्रार आहे, त्या विभागाच्या प्रमुखांकडे संबंधित अर्ज पाठविण्यात येईल. सदर विभागप्रमुख अर्जातील विनंतीबाबत केलेल्या कार्यवाहीच्या अहवालासह लोकशाही दिनी हजर राहतील. सदर अहवाल, अर्जदाराची विनंती, त्याबद्दलचे नियम, महापालिकेची भूमिका, तरतुदी याबाबींचा विचार करून लोकशाही दिन प्रमुख योग्य निर्णय देतील. लोकशाही दिनाकरीता अस्विकृत करण्यात आलेले अर्ज पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी आठ दिवसांमध्ये संबंधित विभागाकडे पाठवले जातील.
लोकशाही दिन कार्यक्रम आढावा
ज्या आठवड्यात लोकशाही दिन झाला असेल, त्याच आठवड्यात संबंधित महापालिका अतिरिक्त आयुक्त हे लोकशाही दिन कार्यक्रमाचा सविस्तर आढावा अहवाल विभागीय आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांना पाठवतील. अर्जदाराला अंतिम उत्तर लोकशाही दिनानंतर शक्य तितक्या लवकर एक महिन्याच्या आत देण्यात यावे, असे परिपत्रकात नमुद केले आहे.
लोकशाही दिनाकरीता विहित नमुन्यातील अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे
महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त यांच्या नावे अर्ज असावा. महापालिकेच्या सारथी व क्षेत्रीत स्तरावरील जनसंवाद सभेच्या माध्यमातून तक्रार दाखल केली असल्यास त्याचा टोकन क्रमांक अथवा संदर्भ क्रमांकाची प्रत. महापालिकेच्या सारथी व क्षेत्रीय स्तरावरील जनसंवाद सभेच्या माध्यमामधून दाखल तक्रारींबाबत संबंधित विभागप्रमुखाकडून अथवा क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या उत्तराची प्रत अर्जासोबत जोडावी.
अर्जदारांकरीता सर्वसाधारण सूचना
समन्वय अधिकाऱ्यांनी लोकशाही दिनाकरीता निश्चित केलेले स्थळी आणि वेळी अर्जदाराने मूळ अर्जांसह उपस्थित राहावे. विहित नमुन्यातील अर्ज १५ दिवस आधी दोन प्रतींत समन्वय अधिकाऱ्यांकडे अर्जदाराने पाठविणे आवश्यक राहील. याबाबींची पूर्तता केली नसल्यास प्रत्यक्ष लोकशाही दिनी अर्ज सादर करता येणार नाही. प्रकरण थेट महापालिका कार्यालयाशी संबंधित असेल तर लोकशाही दिनातील टोकन क्रमांक व त्याची प्रत आवश्यक राहणार नाही.
